Crime | धक्कादायक..! पुण्यात 'दृश्यम' स्टाईल हत्याकांड..! चारित्र्यावरील संशयावरून शिक्षक पत्नीची हत्या, लोखंडी भट्टीमध्ये जाळला मृतदेह; असा झाला पर्दाफाश ?



पुणे |प्रतिनिधी 

                   शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून, संशयाच्या भरात एका पतीने आपल्या शिक्षिका पत्नीची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह लोखंडी भट्टीमध्ये जाळून टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. या ‘दृश्यम’ स्टाईल हत्याकांडाचा छडा वारजे माळवाडी पोलिसांनी लावला असून, आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे.



आरोपी समीर जाधव (मूळ अमरावती, फॅब्रिकेशन व्यवसाय) आणि मृत अंजली समीर जाधव (खासगी संस्थेत शिक्षिका) अशी या दाम्पत्याची नावे आहेत. त्यांना दोन मुले असून ही मुलं दिवाळीच्या सुट्टीसाठी गावी गेल्याचा फायदा घेत आरोपीने हा खून केला.




▪️अनैतिक संबंधांवरून वाढला संशय

पोलिसांच्या तपासात समोर आलेनुसार, आरोपी समीर याचे एका महिलेशी संबंध होते. मात्र तोच पत्नीवर अनैतिक संबंधांचा संशय घेत असे. एका मित्राच्या मोबाईलवरून ‘I Love You’ असा मेसेज पाठवून त्यावरून स्वतःच आरोप निर्माण करत त्याने पत्नीवर दबाव व संशय वाढवत नेला.





▪️पूर्वनियोजित कट आणि हत्या

             घटनेच्या दिवशी म्हणजेच 26 ऑक्टोबर, समीरने खेड-शिवापूरजवळील गोगलवाडी येथे भाड्याने घेतलेल्या गोदामात पत्नी अंजलीला बोलावले. तिथे त्याने अंजलीचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर गोदामातच लोखंडी भट्टी तयार करून मृतदेह जाळून टाकला.

पुरावा नष्ट करण्यासाठी भट्टी व उरलेली राख नदीत फेकून दिल्याचेही तपासात समोर आले आहे.


▪️हत्या केल्यानंतर बेपत्ता तक्रार दाखल

           घटनानंतर दुसऱ्याच दिवशी आरोपीने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात जाऊन पत्नी बेपत्ता झाल्याची खोटी तक्रार दाखल केली. तो पोलिसांकडे सतत पत्नीचा शोध घेण्याची विनंती करत रहात होता.


मात्र, सीसीटीव्ही फुटेज, लोकेशन तपासणी आणि तांत्रिक पुराव्यांवरून पोलिसांनी आरोपीच्या हालचाली संशयास्पद असल्याचे लक्षात घेतले. कसून चौकशी केल्यानंतर अखेर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.


▪️आरोपी अटकेत..

    वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी समीर जाधवला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.


Post a Comment

0 Comments